दादरच्या इंदू मिलमध्ये होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोडला आहे. आतापर्यंत स्मारकाच्या इमारतीचे ५० टक्के, तर एकूण प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर आहे. असे असताना राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अद्याप मंजुरी मिळू न शकल्याने स्मारकाच्या कामाला वेग देता आलेला नाही. त्यामुळे पुतळ्याच्या मंजुरीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आकार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. करारानुसार स्मारक फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे.

हेही वाचा: मुंबई: महापरीनिर्वाणदिनाच्या दिवशीच मध्य रेल्वेवरील जलद लोकलचे वेळापत्रक कोलमडले

आता मार्च २०२४ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य असून कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २५ फूट उंच पुतळ्याला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प वेग घेऊ शकलेला नाही, असे एमएमआरडीएतील सूत्रांचे म्हणणे आहे.स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची वाढवून २५ फूट करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या प्रतिकृतीत अनेक बदल स्मारक समितीने सुचविले आहेत.

हेही वाचा: मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

या सर्व बदलांच्या अनुषंगाने पुतळ्याच्या आराखड्याला मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजघडीला पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुतळ्याला मंजुरी नसल्याने पुढील काम सुरू करता आलेले नाही. त्यामुळे कामाचा वेग वाढू शकलेला नाही, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर ही मंजुरी मिळावी यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The approval of babasaheb ambedkar memorial statue at indu mill in dadar is stalled mumbai print news tmb 01
First published on: 06-12-2022 at 14:58 IST