मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निविदेनुसार सोमवारी, १४ जुलै रोजी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र निविदा सादर करण्यासाठी मंडळाकडून आता इच्छुकांना दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना २८ जुलैपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.
अंदाजे ३३ एकर जागेवर वसलेल्या अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीत एकूण ४९ इमारती असून त्यात ३३५० सदनिकांचा समावेश आहे. जुन्या झालेल्या या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विकासाची प्रक्रिया सोसायटीकडून सुरू करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि पुनर्विकास रखडला. अखेर रखडलेला हा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची नियुक्ती करून अर्थात सी अँड डी प्रारुपानुसार पुनर्विकास मार्गी लावण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता.
या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुंबई मंडळाने ऑक्टोबर २०२४ मध्ये कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची नियुक्ती करण्याकरीता निविदा प्रसिद्ध केली. या निविदेनुसार रहिवाशांना किमान ६३५ चौ. फुट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राच्या सदनिका देणाऱ्या विकासकाची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र या निविदेला विकासकांचा प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला तब्बल सात वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. सात वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करून दुसऱ्यांदा नव्याने निविदा काढण्यात आली. मात्र त्या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मंडळाने निविदेबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतची विचारणा एका प्रस्तावाद्वारे थेट राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने अटी-शर्तींमध्ये बदल करून निविदा काढण्यास मान्यता दिली होती.
रहिवाशांंना ६३५ चौ. फुटाची घरे देणे शक्य नसल्याने विकासकांनी निविदेला प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आधीची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने, तिसर्यांदा निविदा काढण्यात आली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच मंडळाकडून ६२० चौ. फुटाच्या घरांप्रमाणे निविदा काढण्यात आली. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख सोमवारी असताना निविदेला दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता २८ जुलैपर्यंत निविदा सादर करता येणार असून त्यानंतर निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतरच या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान निविदेला मुदतवाढ देण्यामागचे कोणतेही कारण मंडळाकडून, अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले नाही.