लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीत ७७ विजेत्यांनी खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाही सुरू असतानाच आता आणखी १९ विजेत्यांवर मंडळाने नोटीस बजावली आहे. सोडतीतील एकाच विशेष प्रवर्गात एकाच आडनावाचे अनेक जण विजेते ठरल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब संशयास्पद वाटल्याने मंडळाने या १९ जणांकडून खुलासा मागविला आहे.

म्हाडाच्या सोडतीत स्वातंत्र्यसैनिक वा त्यांच्या वारसांना आरक्षण आहे. त्यानुसार ४,०८२ घरांच्या सोडतीमधील पंतप्रधान आवास योजनेतील अर्थात संकेत क्रमांक ४१२ मधील घरांसाठी, तसेच संकेत क्रमांक ४१५ (कन्नमवारनगर, विक्रोळी) आणि संकेत क्रमांक ४१६ मधील (पहाडी, गोरेगाव, अल्प गट) स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गात एकाच आडनावाचे अनेक विजेते ठरल्याची बाब निदर्शनास आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एका प्रवर्गात एकाच आडनावाच्या १९ विजेत्यांनी मंडळाकडे विहित मुदतीत स्वीकृती पत्र सादर केले आहे.

हेही वाचा…२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियमानुसार स्वातंत्र्यसैनिक वा त्यांच्या वारसांना एकदाच भूखंडाचा वा सदनिकेचा लाभ घेता येतो. अशावेळी एकाच आडनावाचे अनेक विजेते असल्याने हे नेमके एकाच कुटुबांतील (वशांवळीतील) आहेत का, त्यांनी याआधी सदनिकेचा वा भूखंडाचा लाभ घेतला आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याअनुषंगाने मंडळाने या १९ विजेत्यांना ऑनलाईन नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या विजेत्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.