महिलेची सोनसाखळी चोरून पळ काढणाऱ्या एका सोनसाखळी चोराला एका सतर्क नागरिकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. माटुंगा परिसरात बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
जेटीबी नगरमध्ये वास्तव्यास असेलेले रफिक शेख बुधवारी ते माटुंगा येथील चार रस्ता परिसरातून जात होते. यावेळी एक चोर चाकूचा धाक दाखवून एका महिलेचा मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न करीत होता. रफिक यांनी हा प्रकार पाहिला आणि तत्काळ त्यांनी आरोपीच्या दिशेने धाव घेऊन महिलेची सुटका केली. यावेळी आरोपीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र रफिक यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. धाडस करून आरोपीला पकडून दिल्याबद्दल रफिक यांचा पोलीस उप आयुक्त संजय पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी पोलिसांच्या वतीने त्यांचा गौरव केला आहे.