मुंबई: अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने मुंबईतून दोघांना अटक केली. याप्रकरणी ११५ ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांहून अधिक आहे. ते खरेदी करण्यासाठी बिटकॉइन या कूट चलनाचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.

यश कलानी (२८) व सुकेतू तळेकर (४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघेही वांद्रे येथील रहिवासी आहेत. तळेकर रेस्टॉरन्ट मालक आहे. मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात अमेरिकेतून आलेल्या पाकिटामध्ये गांजा असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाकडून आझाद नगर टपाल कार्यालयात ते पार्सल अडवण्यात आले. त्या संशयीत पाकिटाचा माग काढला. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व प्रकार सांगण्यात आला. त्यानुसार बनावट टपाल तयार करून संबंधित पत्त्यावर सीमाशुल्क अधिकारी पोहोचले. तेथे सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली. आरोपींविरोधात यापूर्वीही अंमलीपदार्थाप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. ९ किलो गांजा प्रकरणी २०२० ला अंमलीपदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १ कोटी ६२ लाख रुपये होती.

हेही वाचा… वेदांच्या विज्ञानभरारीवर एनसीईआरटीचे शिक्कामोर्तब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या परदेशातून येणाऱ्या गांजाचे प्रमाणही वाढले आहे. कुरियर अथवा टपालाद्वारे गांजा मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. पैशांची देवाण-घेवाणही तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते. त्यासाठी बिटकॉइन सारख्या कूट चलनाचाही वापर केला जात आहे. तसेच डार्कनेटच्या माध्यमातून कुठल्याही ठिकाणी पाहिजे ते अमलीपदार्थ मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचाही वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.