Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. गेल्या महिन्याभरापासून याप्रकरणी कुस्तीगीरांनी जंतरमंतर दणाणून सोडले आहेत. २८ मे रोजी जंतरमंतरहून नव्या संसद भवनाच्या दिशेने जाताना पोलिसांनी या आंदोलकांवर बळाचा वापर केला. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना याप्रकरणी विचारण्यात आले. देशातील सर्वांना कायदा समान आहे, असं म्हणत आम्ही खेळांडूंचा सन्मान करतो असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> ‘एक आरोप सिद्ध झाला, तरी फाशी घेईन’ब्रिजभूषण सिंह यांचे कुस्तीगिरांना आव्हान

“आम्ही या प्रकरणाला फार संवेदनशील पद्धतीने हाताळत आहोत. खेळाडूंची मागणी होती समिती स्थापन व्हावी, त्याप्रमाणे समिती स्थापन केली. तपास करण्याची मागणी केली, आम्ही तपासही सुरू केला. एफआयआर नोंदवण्याची मागणी केली, आम्ही तेही केलं. सुप्रिम कोर्टाने मॅजिस्ट्रेट कोर्टात जाण्यास सांगितलं. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना काम करायला देण्यास त्यांनी मज्जाव केला. त्यांची तीही मागणी मान्य केली. सब कमिटी स्थापन केली. दिल्ली पोलीस तपास करताहेत. जे जे खेळाडूंनी सांगितलं ते सगळं करतोय. देशातील कोणत्याही नागरिकाची तक्रार येते तेव्हा पोलीस तपास करतात, तपासानंतर कारवाई केली जाते. या प्रकरणातही तपास सुरू आहे. खूप लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. पोलीस त्यांचा अहवाल सादर केले. तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली पाहिजे”, असं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

“या देशातील १४० कोटी जनतेसाठी कायदा सर्वांसाठी समान आहे. आमच्यासाठी खेळ आणि खेळाडू दोघेही महत्त्वपूर्ण आहेत. खेळासाठी मोदी सरकारने बजेटमध्ये खूप वाढ करून ठेवली आहे. सुविधा वाढवल्या. मोदींनी खेळाडूंना जेवढा मान-सन्मान दिला आहे तो देशापासून लपलेला नाही”, असंही अनुराग ठाकूर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिल्ली पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही पावले उचलू नयेत”, असं आवाहन अनुराग ठाकूर यांनी काल (३१ मे) केले होते. “मला यावर भाष्य करायचे नाही पण मी हे सांगेन, माझ्या प्रिय खेळाडूंनो, दिल्ली पोलिसांच्या तपासाची वाट पहा. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाशी केलेल्या चर्चेला अनुसरून एफआयआर नोंदवला आहे. खेळाला किंवा कोणत्याही खेळाडूला हानी पोहोचवणाऱ्या तपासाचा निष्कर्ष येईपर्यंत तुम्ही कोणतीही पावले उचलली नाहीत तरच ते योग्य ठरेल. आम्ही सर्व खेळ आणि खेळाडूंच्या बाजूने आहोत. त्यांची प्रगती व्हावी अशी आपली सर्वांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या देशात खेळाची प्रगती झाली आहे . केवळ अर्थसंकल्पच नाही तर उपलब्धी देखील आहे,” ते पुढे म्हणाले होते.