Mumbai Weather Todayमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. शहर आणि उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीही पाऊस पडत होता. बुधवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील काही तासांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दादर, वरळी, भायखळा, अंधेरी, घाटकोपर या परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याचबरोबर अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. परिणामी राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह विदर्भ, तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहील. इतर भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर फारसा नसेल.
गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस
मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० पर्यंत मुंबईत पडलेला पाऊस
मुंबई महापालिका मुख्यालय – १०२.८ मिमी
नायर रुग्णालय- ६४.४६ मिमी
शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा- ४३.२ मिमी
ना.म.जोशी मार्ग महापालिका शाळा – ५० मिमी
रावळी कॅम्प- २३.३१ मिमी
पवई – ५५.६ मिमी
बर्वे नगर महापालिका शाळा – ४८.६ मिमी
भांडूप – ४२ मिमी
जोगेश्वरी – ५७.६ मिमी
दिंडोशी – ४५.४ मिमी
कुठे पावसाचा अंदाज?
अति मुसळधार : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर
मुसळधार : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर
विजा, मेघगर्जनेसह पाऊस : धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ
शेतकऱ्यांना दिलासा
मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस सोयाबीन, तूर, मुग, उडीद आणि हळदीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे.
मुंबईत मुसळधार
मागील दोन दिवसांपासून मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत होता. पावसाच्या पुनरागमनामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.