गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील किमान तापमान कमी झाल्याने थंडीची लाट आली होती. राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमान सुमारे ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, आता किमान तापमानात पुन्हा वाढ होत असल्याने थंडी गायब होऊन उष्मा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा- पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती
संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस म्हणजे सोमवारपर्यंत किमान तापमानात वाढ होणार आहे. सरासरी तापमानापेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील पारा खाली उतरल्याने गारठा जाणवत होता. दिवसा कमाल तापमान अधिक आणि रात्री-पहाटे तापमान कमी होत असल्याने संमिश्र वातावरणाला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता व यापुढील तीन दिवस किमान तापमानात वाढ होणार असून थंडीची लाट परतणार आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० च्या नोंदीनुसार कुलाबा येथील किमान तापमान २१.९ सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथील किमान तापमान हे १८.८ सेल्सिअस होते.
उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळे राज्यातही अपेक्षित असलेले किमान तापमान घसरणे थांबले आहे. राज्यात कमाल तापमानात विशेष फरक जाणवण्याची शक्यता नाही. मात्र, शनिवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल. तसेच, किमान वाढलेले तापमान हे कदाचित ७ ते ८ डिसेंबर पर्यंत जाणवू शकते, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.