मुंबई : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, असे असतानाही सरकारी आदेशाला वाकुल्या दाखवत अनेक जण कबुतरांना दाणे टाकत आहेत. दहिसर, प्रभादेवी, गिरगांव चौपाटी, जुहू आदी ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यात आल्याचे प्रकार नुकतेच समोर आले आहेत.

महापालिकेकडून दंडात्मक कारवाई होत असतानाही हे प्रकार सुरू असल्याने याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी महापालिकेची नजर चुकवून हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

कबुतरांचा ताप

मुंबईत गेल्या काही वर्षात कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. नागरिकांकडून पुरेसे अन्न उपलब्ध होत असल्याने गृहनिर्माण सोसायट्या, शासकीय कार्यालये, जुन्या इमारती, रेल्वे स्थानकातील छप्पर आदी ठिकाणी ते घरटी बांधून राहतात. मात्र, त्यांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत जडत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

त्यानुसार राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर महापालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली. अद्यापही अनेक ठिकाणी महानगरपालिकेची कारवाई सुरू असली तरीही काहीजण प्रशासनाचा डोळा चुकवून कबुतरांना दाणे टाकत आहेत. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीतील तरतुदीनुसार कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड आकारला जातो. गेल्या दीड वर्षात मुंबई महापालिकेने या प्रकरणी ६२ हजारांहून अधिक रुपये दंड वसूल केला आहे.

कोणकोणत्या भागांत कबुतरप्रेम?

मात्र, दंडात्मक कारवाईचीही भीती न बाळगता बोरिवलीतील फॅक्टरी लेनसह दहिसरमधील सीएस मार्गावर काही ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. गिरगांव चौपाटीवरही शनिवारी चारचाकीमधून आलेल्या एका व्यक्तीने कबुतरांना दाणे टाकले. तिच्या गाडीत सुमारे ८ धान्याच्या गोण्या होत्या. जुहू कोळीवाडा परिसरातील एच. बी. गावडे मार्गावरील बंगल्यांलगत कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. अन्य ठिकाणीही हे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अनधिकृत कबुतरखान्यांचा सुळसुळाट?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण ५१ कबुतरखाने आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत त्याहूनही अधिक कबुतरखाने असल्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यात येत असल्यामुळे अनधिकृत कबुतरखाने उभे राहिले आहेत. तसेच, अनेकदा दुकानदार सकाळी दुकान सुरू करण्यापूर्वी कबुतरांना दाणे टाकतात. त्यामुळेही अनधिकृत कबुतरखान्यांची संख्या वाढत आहे.