विनायक डिगे
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर नेहमीच आग्रही असतात. मात्र रुग्णालयाकडून मागणी करण्यात येणाऱ्या अद्ययावत यंत्रणा खरेदीचे महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याला वावडे असल्याचे दिसत आहे. केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांतील डॉक्टरांनी मागणी केलेली अद्ययावत क्ष-किरण यंत्र खरेदीची प्रक्रिया तीन वर्षांपासून मध्यवर्ती खरेदी खात्याकडून रखडवण्यात आली आहे.
केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांतील डॉक्टरांनी तीन वर्षांपूर्वी अद्ययावत क्ष-किरण यंत्रे आवश्यक असल्याची मागणी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडे केली. होती. त्यानुसार या चार रुग्णालयांसाठी सहा अद्ययावत यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केईएम आणि शीव या रुग्णालयांसाठी प्रत्येकी दोन, तर नायर आणि कूपर रुग्णालयासाठी प्रत्येकी एक यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या यंत्रामुळे पाय आणि मणक्याचे आजार असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. अद्ययावत यंत्रात पाय किंवा संपूर्ण मणक्याचे एक्स रे काढण्याची सुविधा आहे.
त्यामुळे अस्थिव्यंग विभागाच्या डॉक्टरांना रुग्णाच्या पायामध्ये किंवा मणक्यामध्ये नेमके कुठे व्यंग आहे हे समजण्यास मदत होणार आहे. सध्या असलेल्या डिजिटल यंत्राच्या साहाय्याने पूर्ण पायाची क्ष-किरणांद्वारे पाहणी करायची झाल्यास (एक्स रे) झाल्यास रुग्णाला झोपवून चाचणी करावी लागते. रुग्ण झोपल्यामुळे त्याचा पाय पूर्णपणे सरळ होतो. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या पायातील हाडाची अचूक लांबी कळण्यास अडचणी येतात. परिणामी त्यांच्यावर उपचार करणे अवघड होते.याबाबत मुंबई महानगर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याचे प्रमुख विजय बालमवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अनागोंदी कारभाराचा फटका
रुग्णालये, आरोग्य केंद्र, प्रसूतिगृह यांना लागणारी औषधे आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यामध्ये खरेदी खात्याकडून चालढकल करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची माहिती महापालिकेच्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली. हा कारभार सुरळीत झाल्यास पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले.
