मुंबई :राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेदरम्यान पर्यवेक्षणासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने पर्यवेक्षणाची जबाबदारी चक्क शिपाई महिलेवर सोपवण्याची वेळ पालिकेच्या शाळांवर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने नवनियुक्त शिक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द, गोवंडी या परिसरातील शाळांमध्ये पर्यवेक्षणासाठी शिक्षकच नाहीत.

राज्यातील शिक्षणपद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येते. त्यानुसार प्रथम भाषा, तृतीय भाषा (इंग्रजी) आणि गणित या तीन विषयाच्या परीक्षा बुधवारपासून परिषदेमार्फत घेण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पायाभूत चाचणी ६ ते ८ ऑगस्टदरम्यान होत आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या ८८५ शिक्षणसेवकांसाठी २१ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरांमध्ये शिक्षणसेवकांना मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची माहिती व्हावी, सेवा-शर्थींची नियमावली, शालेय व्यवस्था, विद्यार्थी सुरक्षा व त्याविषयी असणारे फायदे, शिष्टाचार पद्धती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अध्ययन अध्यापन प्रक्रिया आरटीई कायद्याची अमलबजावणी आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या अखेरच्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी पॅट परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषयाची परीक्षा हाेती. त्याचदिवशी मानखुर्द व गोवंडी या परिसरातील शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने या परीक्षेसाठी प्रशिक्षण पुढे न ढकलता कायम ठेवले.

परिणामी मानखुर्द व गोवंडीमधील अनेक शाळांमध्ये परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यामळे काही शाळांमधील मुख्याध्यापकांनी स्वत: पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पडली, तसेच शिक्षकांची कमतरता असल्याने सहावी व सातवीच्या वर्गातील परीक्षेची जबाबदारी शाळेतील शिपाई महिलांकडे सोपवली. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत घेण्यात आलेल्या परीक्षेबाबतच प्रश्न उभे राहिले आहेत.

नवनियुक्त शिक्षण प्रशिक्षणासाठी गेले असले तरी ही परीक्षा ही पूर्ण दिवस नसल्याने पर्यवेक्षणासाठी शालेय पातळीवर नियोजन करणे आवश्यक होते. मात्र ते का झाले नाही याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल.- सुजाता खरे, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका