मुंबई : मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिम येथील गिलबर्ट हिल परिसरात बांधलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी केली.

अंधेरी येथील गिलबर्ट हिल परिसरात बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. हा जलतरण तलाव मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण ठरावा या अनुषंगाने संबंधित परिसराचा विकास करण्यात येईल, असेही लोढा म्हणाले. जलतरण तलावाच्या मोकळ्या जागेत व्यायामशाळेचीही उभारणी करावी, तसेच जलतरण तलावाच्या सभासद नोंदणीमध्ये महिलांना अधिकाधिक प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. येत्या महिन्याभरात वरळी, विक्रोळी आणि अंधेरीतील कोंडीविटा येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच नागरिकांना त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त किशोर गांधी यांनी दिली.

हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर विजेत्यांचा नव्या घरात प्रवेश, ‘इतक्या’ विजेत्यांना तात्पुरत्या देकारपत्राचे वितरण

मुंबई महानगरपालिकेकडून यापूर्वी शहर व उपनगरात एकूण नऊ जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत. गिलबर्ट हिल येथील जलतलावाची त्यात भर पडली आहे. अंधेरीतील जलतरण तलावाची सदस्य नोंदणी प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली असून २७५० सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्वाची नोंदणी करता येणार आहे. सर्वसाधाणपणे सदस्य नोंदणीसाठी ८ हजार ४१० रुपये वार्षिक शुल्क आकरण्यात येत असून १५ वर्षाखालील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ४ हजार ३७० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. महिलांना २५ टक्के सवलतीत म्हणजेच ६ हजार ३९० रुपयांमध्ये तलावाचे सभासदत्व घेता येणार आहे.

हेही वाचा – महारेरा मानांकन ‘सारणी’ म्हणून ओळखले जाणार, दर सहा महिन्यांनी मानांकन सार्वजनिक होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांना https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर सदस्य नोंदणी करता येईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभासदांसाठी हा जलतरण तलाव १ ऑक्टोबरपासून खुला करण्यात येईल.