रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील एक दुचाकी हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात वास्तव्यास असलेल्या रमाकांत जाधव याने त्याची दुचाकी घराजवळ रस्त्यावर उभी केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक त्याची दुचाकी गायब झाली याबाबत त्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीचा शोध सुरू केला.
भांडुप पोलीस गुरुवारी रात्री परिसरात गस्त घालत असताना ही दुचाकी एक इसम चालवत असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून शंकर घाटे (२१) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी गाडीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर शंकरने दुचाकी चोरल्याचे कबूल केले.