मुंबई : गोरेगाव येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय परिचारिकेच्या घरात शिरलेल्या दोन चोरांशी अनपेक्षितपणे सामना झाला. या महिलेच्या घरात कुणी नसताना चोर शिरले होते. नेमकी त्याच वेळी ती घरी आली आणि चोरांना पळ काढावा लागला.
सना खान (२३) पतीसह गोरेगावच्या भगतसिंग नगरात राहतात. त्या अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. त्यांना रात्रपाळीतही काम करावे लागते. त्यांचे पती चालक असून ते दिवसा आणि रात्री अशा दोन्ही पाळ्यांमध्ये काम करतात. त्यांचे पती बुधवारी रात्री कामावर गेले होते. तर सना आपल्या बहिणीच्या घरी अंधेरी येथे गेल्या होत्या. गुरूवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. तिने दार ढकलून आत प्रवेश केला असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घरात दोन अनोळखी व्यक्ती होत्या. ते चोरी करण्यासाठी घरात शिरले होते. त्यांना पाहून सना प्रचंड घाबरल्या. त्यांनी चोरांना प्रतिकार केला नाही. मात्र अचानक सना आल्याचे पाहून चोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, चोरांनी घरातील रोख २५ हजार रुपये चोरून नेले. सना उशीर आल्या असत्या तर घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी झाली असती.
या प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३ (५), ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरांनी कुठलाही दुखापत केली नाही. घर मालक आल्यामुळे ते पळून गेले. आम्ही चोरांचा शोध घेत आहोत, असे बांगूर नगर पोलिसांनी सांगितले.