मुंबई : विश्वचषक सामन्यांसाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची व मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ५०० कोटी रुपये देण्यासह गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सोडण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

तुमच्या सरकारकडून ५०० कोटी रुपये आणि लॉरेन्स बिष्णोई हवा आहे. नाहीतर मोदी यांच्यासह नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्यात येईल. भारतात सगळं विकत जात, आम्ही काही खरेदी केली आहे. कितीही सुरक्षा पुरवा. आमच्यापासून वाचणार नाही, अशा आशयाचा मजकूर ई मेलमध्ये आहे. तसेच संपर्क साधायचा असेल, तर त्याच ईमेलवर संपर्क साधावा, असे नमूद केले आहे. त्यानंतर संंपूर्ण देशभरातील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा – राज्यात लवकरच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान क्लस्टर -उदय सामंत

हेही वाचा – VIDEO: मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण जखमी

मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांत खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक खोटे दूरध्वनी आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकावर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलू दिले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता.