मुंबई: रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून काही मुद्देमाल जप्त केला असून तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात राहणाऱ्या मुशीर शेख यांच्या घरी १८ सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. शेख कुटुंबिय घरात नसताना अज्ञात चोराने त्यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ आणि इतर काही वस्तू असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज लुटून नेला होता. दुसऱ्या दिवशी शेख कुटुंबिय घरी परतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानी तात्काळ याबाबत घटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले. यापैकी एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आरोपींनी गुन्ह्यांसाठी वापरलेली रिक्षा पोलिसांच्या निदर्शनास आली. रिक्षाच्या क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गोरेगाव परिसरातून अब्दुल अन्सारी (२१), स्टेर्लिन कौडर (२८) आणि मुस्ताक शेख (३३) या तीन आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.