लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वरळी येथे चॉकलेट देऊन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके सज्ज केली. पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपी महिलेला अटक केली. आरोपी महिलेने अशा प्रकारे इतर मुलांचे अपरण केले आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

३२ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबियासोबत वरळीतील प्रेमनगर परिसरात राहतात. त्यांची तीन वर्षाची मुलगी बुधवारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणारी मुलगी घरी आली. एक महिला तुमच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गल्लीतून खेचून घेऊन गेली, असे तिने सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला व कुटुंबिय घाबरले. त्यांनी प्रेमनगर, वरळी नाका, मद्रासवाडी, वरळी सी फेस या ठिकाणी आपल्या मुलीचा शोध घेतला, परंतु ती सपडली नाही अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ याप्रकरणी पथके सज्ज केली आणि अपहरण झालेल्या मुलीच्या शोधार्थ पथके रवाना झाली. त्या पथकांनी संपुर्ण प्रेमनगर परिसरातील सीसी टीव्ही चित्रण तपासले असता, गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाजवळील एका सीसी टीव्हीच्या चित्रणात एक संशयीत महिला दिसली. त्या चित्रणाची चित्रफीत बनवून पोलीस ठाणेचा व्हाट्सअप ग्रुप, तसेच मोहल्ला कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर, तसेच तेथील स्थानिक रहिवाशांना पाठवण्यात आली, वरिष्ठांनी तपासाच्या अनुषंगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रेमनगर परिसरात पोलीस पथकांनी शोध मोहीम राबवली. तसेच या शोध मोहिमेत स्थानिक रहिवाशांचीही मदत घेण्यात आली. वऱळी नाका प्रेम नगर येथील खोली क्रमांक ५२० मध्ये राहणारी संशयित महिला सापडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिपाली बबलु दास असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तिच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दिपालीला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रुपवते, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.