चोख पोलीस बंदोबस्त; दुपापर्यंत चित्र स्पष्ट
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. उद्या दुपापर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकेल.
सर्व विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी केंद्रांसभोवताली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी दिली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
गेल्या सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६१.१३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा ३२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदान यंत्रात बंद केला होता. सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ६७.१५ टक्के मतदान झाले असून येथे प्रामुख्याने भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील या दोन माजी खासदारांमध्ये लढत होत आहे.
राज्याच्या विविध भागांतील २६९ ठिकाणी २८८ केंद्रांवर ही मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन साहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक राहणार असून तासाभरात मतमोजणीचा पहिला कल येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मात्र गतीने मतमोजणीचे कल येतील आणि दुपारनंतर राज्यात सत्ता कोणाची येणार आणि कोणाला विरोधी पक्षात बसावे लागेल याचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीच्या सर्वात कमी म्हणजेच १३ फेऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात होणार असून पलूस आणि इस्लामपूर या मतदारसंघांत १४ फेऱ्या होतील. तर सर्वाधिक ३४ फेऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड मतदारसंघात होणार आहेत. त्या खालोखाल पाटणमध्ये ३३, वाईमध्ये ३२, ऐरोली, आष्टी, सातारा, ओवळा-माजिवडा, कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांत मतमोजणीच्या ३१ फेऱ्या होतील.
मतमोजणी पूर्ण झाल्यांतर प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ांची मोजणी केली जाणार असून ही पाच केंद्रे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत चिठ्ठी टाकून निवडले जातील. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि मतदान यंत्र (ईव्हीएम) वरील मतांची पडताळणी केली जाईल. तर मतमोजणीच्या सुरुवातीस टपाली मते आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.
मोबाइलवरही निकाल पाहण्याची सुविधा
लोकांना निवडणुकीचा निकाल भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘ Voter Helpline’ या गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अॅण्ड्रॉइड अॅपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.
