भारतात रविवारच्या (२१ जून) सूर्यग्रहणाची सुरुवात सकाळी ९.५८ वाजता भूज येथे खंडग्रास स्वरूपात होईल. ते दुपारी २.२९ वाजता दिब्रुगड येथे समाप्त होईल. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नांदेड या तीन शहरांतून हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात पश्चिमेकडील घेरसाणा शहरात सकाळी ११.५० वाजता होईल आणि ते सुमारे ३० सेकं द दिसेल.

कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या पट्टय़ावर दिल्लीच्या उत्तरेतील कुरूक्षेत्र आणि डेहराडून ही प्रमुख शहरे आहेत. उत्तराखंडातील कलंक शिखरावर सर्वात शेवटी दुपारी १२.१० वाजता सुमारे २८ सेकं दांसाठी कंकणाकृती ग्रहण दिसेल.

कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकार सूर्याच्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकारापेक्षा लहान असतो. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे काही काळ आकाशात एक प्रकाशवलय किंवा कंकण दिसते. असे ग्रहण फक्त एका बारीक पट्टय़ावरूनच दिसते. यापूर्वीची कंकणाकृती ग्रहणे भारतात १५ जानेवारी २०१० आणि २६ डिसेंबर २०१९ रोजी दिसली. यानंतर २५ ऑक्टोबर २०२२ रोजी देशाच्या पश्चिम भागातून ग्रहण दिसेल.

असे पाहावे ग्रहण

शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या गॉगलने ग्रहण पाहावे. साधे गॉगल असुरक्षित ठरतील. वेल्डिंग करणाऱ्यांचे फिल्टर हार्डवेअरच्या दुकानातून घ्यावेत. १३ किं वा १४ क्रमांकाचे फिल्टर वापरावेत. कागदावर एक बारीक छिद्र पाडून दुसऱ्या एका पांढऱ्या कागदावर सूर्याची प्रतिमा निर्माण करता येते. तसेच हा कागद एका आरशाच्या काचेवर लावून सूर्याची प्रतिमा दूरवर निर्माण करता येईल.

कधीही सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी बघू नका.  दृश्यपटलाला कायमची इजा होऊ शकते. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यातून कधीही बघू नये. तसेच काचेवर काजळी धरून त्यातून सूर्याकडे बघू नये.