मुंबई : काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतील पारंपरिक व तुलनेने परवडणाऱ्या पर्यटनस्थळांवर अलीकडे घडलेल्या सुरक्षाविषयक घटना, नैसर्गिक आपत्ती आणि अस्थिर वातावरणामुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. याचा थेट परिणाम पर्यटनस्थळ निवडीवर झाला असून पर्यटकांचा कल परदेशवारीकडे वळला आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर अस्थिर वातावरण आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आलेली पूरस्थिती यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कमी पैशात प्रवास, व्हिसाची गरज नसणे यांमुळे नेपाळलाही पर्यटकांची पसंती होती. मात्र नेपाळमधील हिंसाचारामुळे तिथेही सुरक्षेची हमी नाही. यंदा नेहमीच्या आणि पसंतीच्या पर्यटनस्थळांवर लागोपाठ घडलेल्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटनांमुळे पर्यटक परदेशात जाण्यास अधिक पसंती देत आहेत. युरोप, अमेरिका किंवा आग्नेय आशियातील ठिकाणे तुलनेने महागडी असली, तरी सुरक्षिततेची हमी, उच्च दर्जाच्या सुविधा आणि अनुभवाची विविधता या कारणांमुळे प्रवासी त्याकडे वळत आहेत. पर्यटन व्यावसायिकांच्या मते, परदेशी टूर पॅकेजेसच्या चौकशीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यटक आता खर्चाला नव्हे तर सुरक्षितता आणि अनुभवाला महत्त्व देत आहेत. त्यामुळे पर्यटक परदेशी पर्यटनस्थळांकडे वळत आहेत.

देशांतर्गत पर्यटन मागे पडले

मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांतील पर्यटक दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत मोठ्या प्रमाणावर नेपाळ, काश्मीर किंवा उत्तराखंडकडे वळत असत. आता मात्र या चौकशीत मोठी घट झाली आहे. याउलट परदेशी टूर पॅकेजेसच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप-अमेरिकेसारख्या महागड्या स्थळांबरोबरच थायलंड, बाली, मलेशिया यांसारखी दक्षिण-पूर्व आशियाई पर्यटन स्थळेही पर्यटकांना खेचत आहेत. दरम्यान, देशांतर्गत पर्यटनस्थळांमध्ये सुरक्षिततेबरोबरच पायाभूत सुविधा, पर्यटकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारला तरच भारतीय प्रवासी पुन्हा मोठ्या प्रमाणात देशांतर्गत पर्यटनाचा मार्ग धरतील. अन्यथा परदेशवारीचं आकर्षण येत्या काही वर्षांत अजून वाढण्याची शक्यता आहे, असे काही पर्यटकांनी सांगितले.

आरक्षणातील घट

काश्मीर – काश्मीरमध्ये एप्रिल ते मे महिन्यादरम्यान ३ ते ४ हजार आरक्षण पर्यटकांनी रद्द केली. आणखी ५ हजार आरक्षण होण्याची शक्यता होती. मात्र, तीही झाली नाहीत. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत दरवर्षीप्रमाणेच पर्यटकांचा कल काश्मीरकडे होता.

नेपाळ- नेपाळचे आरक्षण हे प्रामुख्याने दिवाळी सुट्ट्यांमध्ये करण्यात आलेले होते. मात्र अलीकडेच तिथे झालेल्या हिंसाचारामुळे ५० टक्के पर्यटकांमध्ये घट झाली आहे. याचबरोबर आरक्षण केलेल्यांपैकी ६ ते ७ हजार पर्यटकांनी आरक्षण त्याच वेळी रद्द केली. तर, काही आरक्षण पर्यटक व्यावसायिकांकडूनच रद्द करण्यात आली.

उत्तराखंड , हिमाचल प्रदेश- येथे साधारण ४० ते ५० टक्के पर्यटकांमध्ये घट झाली आहे.यंदा दिवाळीसाठी दरवर्षीपेक्षा फारच कमी आरक्षण झालेले आहेत.

अपेक्षित खर्च

परदेशातील पर्यटनस्थळांपैकी युरोप, ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल आणि मालदीव या ठिकाणांसाठी साधारण २.५ ते ४.५ लाख रुपये खर्च आहे. याचबरोबर थायलंड (बँकॉक, पटाया, फुकेत), सिंगापूर, मलेशिया, दुबई/अबूधाबी या ठिकाणांसाठी ७० हजार ते १ लाखापर्यंत खर्च अपेक्षित असतो.

मागील काही काळ हा असा होता, जेथे पर्यटक वेळ, पैसा, प्रवास या सगळ्याचाच विचार करून पर्यटनस्थळ निवडायचे. पण आता सुरक्षितता, शांतता यावर जास्त भर देत आहेत. झेलम चौबळकेसरी टूर्स

पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे

थायलंड (बँकॉक, फुकेत, पटाया, क्राबी)

सिंगापूर

मलेशिया (क्वालालंपूर, लंगकावी)

बाली (इंडोनेशिया)

व्हिएतनाम (हनॉई, हा लाँग बे)

कंबोडिया