मुंबई : मंगलम् ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या व्यापारचिन्ह हक्क (ट्रेडमार्क) उल्लंघनाप्रकरणी साडेचार कोटी रुपयांचा दंड भरण्याच्या एकलपीठाने पतंजलीला दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली.

उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पतंजली आयुर्वेद लिमिटेडने हेतुत: उल्लंघन केल्याचा ठपका उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने जुलै महिन्यात कंपनीवर ठेवला होता, तसेच, पतंजलीला साडेचार कोटी रुपयांचा दंड सुनावताना ती रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. पतंजलीने एकलपीठाच्या या निर्णयाला खंडपीठासमोर आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सोमवारी कंपनीच्या याचिकेवर निर्णय देताना एकलपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्याच वेळी, साडेचार कोटी रुपयांच्या दंडाच्या रकमेपैकी ५० लाख रुपयांची रक्कम न्यायालयातच जमा राहणार असल्याचेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>मुंबईच्या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंगलम् ऑरगॅनिक्सने पतंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन कापूर उत्पादनांच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने ३० ऑगस्ट २०२३ रोजी पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यापासून मज्जाव केला होता. त्यानंतरही, पतंजलीकडून कापूर उत्पादनांची विक्री सुरू असल्याचा दावा करून मंगलम् ऑरगॅनिक्सने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन पतंजलीविरोधात अवमान याचिका केली होती. आदेशाची पायमल्ली करण्याचा पतंजलीच्या हेतूबद्दल आपल्या मनात तीळमात्र शंका नसल्याचेही पतंजलीचे सर्व दावे फेटाळताना एकलपीठाने प्रामुख्याने नमूद केले होते.