मुंबई : आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीनिमित्त रस्त्यांवर वाढलेली वाहने आणि गणेश आगमन मिरवणुकांमुळे मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडीचे विघ्न उभे ठाकले आहे. दोन्ही शहरांतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर शनिवारी वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत होते. मुंबईत मोठय़ा सार्वजनिक मंडळांच्या उंच गणेशमूर्ती शनिवारी मंडपस्थळी मार्गस्थ झाल्या. चिंचपोकळीचा चिंतामणी भायखळय़ाच्या बकरी अड्डय़ावरील गणेश कार्यशाळेतून मंडपस्थळी रवाना झाला. ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत मोठय़ा संख्येने तरुणाई या मिरवणुकीत सहभागी झाली होती.

त्यामुळे लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. ‘बेस्ट’ बसचे मार्गही बदलण्यात आले. नरेपार्कमधील परळचा राजा, चिराबाजारचा महाराजा, गिरगावचा विघ्नहर्ता, अ‍ॅन्टॉपहिलचा राजा, अंधेरीचा महाराजा, कुंभारवाडय़ाचा राजा, मुंबईचा महाराजाधिराज, मरोळचा राजा, विक्रोळी पार्कसाईटचा आराध्य, काळेवाडीचा विघ्नहर्ता, ताडदेवचा विघ्नहर्ता, अंधेरीचा पेशवा, फोर्टचा देवामहागणपती यासह भाईंदर, वसई परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती शनिवारी कार्यशाळांमधून मंडपस्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्यामुळे वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले होते.

हेही वाचा >>> एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम!; ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना त्रास होण्याची चिन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गावरही दिवसभर वाहतूक कोंडीचे चित्र होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुंब्रा बाह्यवळण मार्गावर ठाण्याहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या एका टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच शनिवारी सुट्टीनिमित्त गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अनेकजण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने कोंडीत भर पडली. कापूरबावडी, मानपाडा, माजिवडा, ढोकाळी, वाघबीळबरोबरच शहरातील अंतर्गत मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.