महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळातील एक वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक यांच्यात झालेल्या झटापटीत अखेर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची अमरावती गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय या अधिकाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: वेब पोर्टल ‘रिएल इस्टेट एजंट’ असल्याबाबत संदिग्धता कायम
वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील झटापट हा म्हाडात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. या प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. अखेर आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. म्हाडाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. अमरावती गृहनिर्माण मंडळासारख्या कमी महत्त्वाच्या ठिकाणी केलेली बदली ही शिक्षा मानली जात आहे. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याबरोबरच बदली रद्द करण्याचे प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दुरुस्ती मंडळातील कथित वर्तवणुकीबाबत दोषारोपपत्र सादर करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा >>>मुंबई: एमएमआरडीएच्या ‘मुंबई १’ कार्डद्वारे मेट्रोसह बेस्ट प्रवासही; बेस्टचे तिकीटही आता उपलब्ध
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याबाबत याआधीही बाचाबाचीच्या घटना घडल्या होत्या. कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने अपमान करण्यात हा वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असे. मात्र एका वरिष्ठ लिपिकाने असाच अपमान सहन केला नाही आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लावून दिली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंच गेले. दोन्ही अधिकाऱ्यांची तक्रार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली. मात्र असे प्रकार शासकीय कार्यालयात शोभत नाहीत वा कारवाई नाही झाली तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ शकते, याची शक्यता वाटल्याने संबंधित वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.राजकीय वरदहस्त असलेला हा वरिष्ठ अधिकारी बदली होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत होता. गृहनिर्माण विभागातील एक उपसचिवामार्फत त्याने प्रयत्न सुरू केले. मात्र यावेळी त्याला यश आले नाही.