मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) वर्षांनुवर्षे भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू आहे. अनेकदा चौकशी होऊन, दोषी आढळून आल्यानंतरही अधिकारी पदावर कायम आहेत. त्यामुळे दोषी आढळून आलेल्या वरिष्ठ भांडार अधिकारी प्रियदर्शनी वाघ यांना बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
अनिल परब यांनी दापोडी (पुणे) आणि चिकलठाणा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. महामंडळाच्या कार्यशाळेत सर्व सोयी असूनही ती कामे बाहेर खासगी ठेकेदारांना दिली आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय करवाई करणार आणि किती दिवसांत खरेदी करणार, असा प्रश्न उपस्थित केला होता.
अनिल परब यांनी सभागृहात जी माहिती दिली आहे, त्यात तथ्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळात अनागोंदी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा, नुकसानीस प्रतिबंध न करणे, नियमावलीचा भंग करणे, नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबविणे, जास्त दराने खरेदी करणे, अतिरिक्त खरेदी करून रक्कम अडवून ठेवणे, न झालेली खरेदी दाखविणे, नोंदी ठेवण्यास दुर्लक्ष करणे, अधिकाराचा गैरवापर करणे, पुरेशी खातरजमा न करता जास्तीची रक्कम आदा करणे, वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार होत आहेत. तरीही या अधिकाऱ्यांची फक्त चौकशी झाली आहे. दोषी आढळूनही अधिकारी महामंडळात कायम आहे. त्यामुळे वरिष्ठ भांडार अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रियदर्शनी वाघ यांना बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा सरनाईक यांनी केली.
कायदेशीर प्रक्रिया राबवून बडतर्फ करा
एखाद्या अधिकाऱ्याला असे बडतर्फ करू नका. ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) जातात आणि पुन्हा कामावर येतात. त्यासाठी त्यांना बडतर्फ करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवा. त्यांना नोटीस द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यानंतर बडतर्फ करा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा सरनाईक यांनी केली.