मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता मुंबईत एकीकडे जवळपास सगळ्याच नाट्यगृहात वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. तर दुसरीकडे नामांकित कलाकारांचे तीन मोठे हिंदी चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित होणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी सुट्टी असल्याने नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक येतात हे लक्षात घेऊन यंदा मुंबईत त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सहा नाटकांचे प्रयोग होणार आहेत. जोडून सुट्ट्या आल्याने नाटक आणि चित्रपटाची जोरदार तिकीट विक्री सुरू असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सहा वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग मुंबईत होणार आहेत. भरत जाधव एन्टरटेन्मेट निर्मित आणि केदार शिंदे लिखित – दिग्दर्शित ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे. याच दिवशी भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ या नाटकाचा ५८ वा प्रयोग आणि ‘मोरूची मावशी’चा ८६२ वा प्रयोगही प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सलगपणे होणार आहेत. भरतसारख्या लोकप्रिय कलाकाराच्या तीन वेगवेगळ्या नाटकांचे सलग प्रयोग अनुभवण्याची संधी नाट्य रसिकांना मिळणार आहे. तर रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याचे १५ ऑगस्ट रोजी दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात सकाळी ७.१५ ते रात्री १०.३० या वेळेत सहा प्रयोग होणार आहेत. एकाच नाटकाचे सहा प्रयोग सादर करून नवा विश्वविक्रम रचण्याची तयारी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या चमूने केली आहे.चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित स्वतंत्र विचारसरणीनुसार आयुष्य जगू पाहणाऱ्या आई आणि तिच्या तीन मुलींची कथा रंगवणाऱ्या ‘चारचौघी’ या नाटकाचे शेवटचे काही प्रयोग सादर होत आहेत. त्यातला एक प्रयोग १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन येथे सादर होणार आहे. तर नामांकित कलाकारांच्या संचात सुरू असलेल्या, भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचेही शेवटचे काही प्रयोग सादर होणार असून स्वातंत्र्यदिनी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या नाटकाचे दोन प्रयोग होणार आहेत. त्यापैकी संध्याकाळचा प्रयोग आधीच हाऊसफुल झाला आहे.

हेही वाचा – राज्यातील २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबई पोलीस दलाला मिळाले चार नवे उपायुक्त

‘चारचौघी’ या नाटकाचा १५ ऑगस्ट १९९१ रोजी झालेला पहिल्या प्रयोग हाऊसफुल झाला होता. त्यामुळे, प्रेक्षक हे नाटकांना नेहमी प्राधान्य देतात. मोठ्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांचे बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन नसेल तर, नाटकांना प्रेक्षकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तर कितीही नवीन माध्यमे आली तरी ‘पुन्हा सही रे सही’, ‘चारचौघी’, ‘अलबत्या गलबत्या’,‘यदा कदाचित रिटर्न्स’ यांसारख्या चांगल्या नाटकांना प्रेक्षकांची आजही गर्दी होते, असा विश्वास निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केला. तर प्रेक्षकांना सतत वेगळे काही देण्याच्या प्रयत्नांतूनच यंदा १५ ऑगस्टला माझेच तीन वेगवेगळ्या धाटणीचे नाट्यप्रयोग प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे, त्यांचा तिन्ही नाटकांना नक्की प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – धरणे कठोकाठ तरीही वरळीत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड येथे कमी दाबाने पाणीपुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच दिवशी तीन मोठे चित्रपट

प्रेक्षक गेले काही दिवस ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ‘स्त्री-२’, अक्षय कुमारचा बहुकलाकारांची फौज असलेला ‘खेल खेल मे’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हे तीन चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. तीन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने तिकीट खिडकीवर कमाईसाठी चांगलीच चुरस रंगणार आहे. सध्या ‘स्त्री २’च्या आगाऊ तिकीटविक्रीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून १५ ऑगस्टला या चित्रपटाचे बरेचसे शो आत्ताच हाऊसफुल झाले आहेत.