मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सांस्कृतिक कार्यमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दुर्मिळ व स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली.

स्थानिक वृक्षप्रजाती या लहान किटक, फुलपाखरे, पक्षी व लहान वनप्राणी यांना अन्न व योग्य अधिवास उपलब्ध करून देतात. या पार्श्वभूमीवर जैविक चक्र व पर्यावरणीय साखळी टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक व दुर्मिळ वृक्ष राष्ट्रीय उद्यानात लावण्यात आले. यातील काही प्रजातींवर पक्ष्यांना घरटी बांधता येतात, काही कीटक व फुलपाखरांना पोषण देतात, तर काही लहान वन्यप्राण्यांना टिकून राहण्यासाठी अधिवास उपलब्ध करून देतात. यामुळे संपूर्ण अन्नसाखळी पूर्ण होते असल्याचे शेलार यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या वृक्षारोपणात करपा, हम्ब, वत्सोल, सफेद धूप, चांदकुडा, उपास, तांबडा कुडा, अंबेरी, तिरफळ, फांसी, कडव्या शिरीड, गोरखचिंच, कुंकुम, चारोळी, नांद्रुख, खडक पायर, दातीर, नागकेशर, सप्तरणगी, जांभुळ, समुद्रशिंगी, शेरस, रानबिबा, काळा धूप, वरंग अशा दुर्मिळ व स्थानिक प्रजातींचा समावेश आहे.