मुंबई : नववर्षाची सुरुवात होण्यास अवघे काहीच दिवस उरले असून पर्यटनाचा हंगाम बहरला आहे. मात्र मोठी सुट्टी घेऊन देश-विदेशांत जाण्याऐवजी तीन ते चार दिवसांची विश्रांती घेण्याकडे पर्यटकांचा कल सध्या दिसतो आहे.

सध्या नाताळच्या सुट्टीचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील अलिबाग, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, कोकण आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. तसेच केरळ, गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू – काश्मीर, अंदमान – निकोबार, गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, अयोध्येतील राम मंदिर या ठिकाणांकडे ओढा आहे. राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर वाराणसी, प्रयागराज याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी या दोन दिवसांसाठी विशेषत: समुद्रकिनारे असणाऱ्या पर्यटनस्थळांना अधिक पसंती आहे.

हेही वाचा >>> ॲलोपॅथी औषधे देण्याची होमिओपॅथी डॉक्टरांना परवानगी; अन्न, औषध प्रशासनाचा निर्णय

देशांतर्गत निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक पर्वणी अनुभवण्यासाठी राजस्थान, केरळ, गोवा आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. तसेच संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका यांसारख्या देशांसाठी ‘ई-व्हिसा’ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेवटच्या क्षणी सहलींचे आयोजन करणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या कौटुंबिक सहलींचे प्रमाण वाढले आहे. मालदीव, दुबई आणि दक्षिण आशियाई परिसरातील पर्यटनस्थळी जाणे नागरिक पसंत करत आहेत’, असे थॉमस कूकच्या (भारत) राजीव काळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल बदलला

एखाद्या ठिकाणी गेल्यावर आसपासच्या परिसरातील जास्तीतजास्त स्थळे बघायची, अधिकाधिक फिरायचे हा शिरस्ता आता कार्यपद्धतीमुळे बदलल्याचे दिसते आहे. विश्रांती, वातावरणातील बदल याला पर्यटकांचे प्राधान्य असल्याचे दिसते. प्रसिद्ध पर्यटनस्थळांपेक्षा नवीन पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या अभावाने पर्यटकांची निराशा होते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून या सर्व गोष्टींकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे. कामाचे दिवस आणि सुट्टीच्या दिवसांचे योग्य नियोजन करत नागरिक सहकुटुंब तीन ते चार दिवसांसाठी सहलीला जाणे पसंत करतात. तसेच त्रितारांकित व पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. – झेलम चौबळ, केसरी टूर्स