विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सुतोवाच केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या पातळीवर दिवसभर प्रयत्न सुरू होते. अहमदनगरची जागा सोडावी म्हणून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शब्द टाकला आहे. या साऱ्या घडामोडींमुळे विखे-पाटील यांच्या उद्याच्या भाजप प्रवेशाचे काय होणार याचा संभ्रम कायम होता.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने विखे-पाटील यांच्या मुलासाठी सोडावी म्हणून दिल्लीच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ही जागा मिळावी म्हणून विनंती करण्यात आली. राहुल गांधी यांनीही पवारांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. पवारांकडून अद्याप होकार मिळाला नव्हता. तरीही काँग्रेस नेते आशावादी आहेत.  शरद पवार यांच्या उपस्थितीत रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नगरच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली.  सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले होते. काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला.

संजय काकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पुण्यातून भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने काँग्रेसच्या वाटेवर असलेले राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षां‘ बंगल्यावर गेले होते. काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन मुूख्यमंत्र्यांनी त्यांना केले. काकडे काँग्रेस प्रवेशावर ठाम आहेत.

दिलीप गांधी समर्थकांची घोषणाबाजी

सुजय  यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध झाल्याने नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी मुंबईत भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष घोषणाबाजी केली. विखे-पाटील हे स्वार्थी असून, त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. गांधी समर्थक विखे-पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले होते.