संदीप आचार्य/ निशांत सरवणकर

मुंबई : क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने कोंबल्याने राज्यातील कारागृहांतील कैद्यांमध्ये विविध आजार पसरत असताना कैद्यांमध्ये मनोविकारही बळावत चालल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्व तुरुंगांत आजघडीला अडीच हजार कैदी मनोरुग्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कैद्यांवर उपचारासाठी आवश्यक औषधांचा तुटवडा आहेच; पण मानसोपचारतज्ज्ञही कमी आहेत.

कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील मुख्य गुन्हेगार जितेंद्र शिंदे याने रविवारी येरवडा कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्यावर मनोविकारतज्ज्ञांचे उपचार सुरू होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाने पत्राद्वारे दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहांचा आढावा घेतला असताना अडीच हजार कैदी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. तुरुंगविषयक नियमानुसार दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे बंधनकारक असते. तथापि अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा अशी तपासणी होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ठाणे कारागृहात सुमारे ६०० हून अधिक महिला कैदी असून त्यापैकी शंभरहून अधिक महिलांना मानसिक आजारांसाठी औषधोपचार सुरू आहेत. अपुरी जागा व अस्वच्छता यामुळे झोप न लागण्याचाही त्रास अनेक महिलांना आहे. अशाच प्रकारे अन्य कारागृहांमध्येही महिला कैद्यांची परिस्थिती असल्याचे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी  सांगितले.

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून त्यासाठी नवीन कारागृहे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. कैद्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही लक्ष घालण्यात येईल. रुग्णांच्या मानसिक आजार तसेच अन्य आजारांविषयी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नांची योग्य ती काळजी घेतली जाईल.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोरुग्ण कैद्यांचे प्रमाण

अमरावती ९७४, ठाणे २००, पालघर १५०, नागपूर ११४, रायगड १०९, यवतमाळ ८६, अकोला ५४, लातूर ५६, जळगाव ३८, नाशिक ५०. मुंबईतील येरवडा व तळोजा मध्यवर्ती कारागृहांतील मनोरुग्ण कैद्यांची माहिती वारंवार विचारूनही आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांकडून उपलब्ध होऊ शकली नाही.