परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. नूर आलम नसरुद्दीन शेख आणि मेहबूब आलम अमरुद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार महिला जोगेश्‍वरी येथे राहत असून तिचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी ती कामानिमित्त खार येथे आली होती. यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखविले होते. तिचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने तिला वीस डॉलरची नोटही दाखवली. त्यानंतर त्यांच्यात चार लाख रुपयांच्या डॉलरचा सौदा झाला होता. ठरल्याप्रमाणे ही महिला तिच्या एका नातेवाईकासोबत वांद्रे येथे आली होती. यावेळी तिथे नूर शेख आणि मेहबूब शेख आले. त्यांनी तिला डॉलर घेऊन येतो असे सांगून तिच्याकडून चार लाख रुपये घेतले. त्यानंतर ते दोघेही एका गल्लीतून निघून गेले होते. बराच वेळ वाट पाहूनही ते दोघेही आले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच या महिलेने निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन दोघांना वांद्रे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना काही डॉलर सापडले. चौकशीत या महिलेची फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर या दोघांनाही फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी काही सिमकार्ड जप्त केली असून याच सिमकार्डचा ते फसवणुकीसाठी वापर करीत होते.