लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कामगार अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत मंगळवारी दोन बाल मजुरांची सुटका करण्यात आली. ही मुले उत्तर प्रदेश व बिहारमधील रहिवासी आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष बालसहाय्य पोलीस कक्षाने (जापू) २०२४ पासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाल मजुरीविरोधात ४० गुन्हे दाखल केले असून या प्रकरणांमध्ये ८७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर्षी आतापर्यंत बाल मजुरीप्रकरणी १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१२ तास काम…

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील रफीक नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान टोपी बनवण्याच्या व्यवसायात अल्पवयीन मुलांना जुंपण्यात आल्याचे निदर्शनास आले. तपासणीत अनुक्रमे १४ व १६ वर्षांच्या मुलांकडून काम करून घेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. मुलांकडून काम करून घेणारा मालक मोहम्मद बुद्रू जामा शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेला १६ वर्षांचा मुलगा बिहार, तर १४ वर्षांचा मुलगा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुलांकडून माहिती घेतली असता ते शाळेत जात नव्हते. तसेच त्यांच्याकडून १२ तास काम करून घेण्यात येत होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वाधिक बाल कामगार उत्तर प्रदेश, बिहारमधील

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बाल कामगारप्रकरणी २८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईत ६१ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली होती. त्याप्रमाणे २०२५ मध्ये एप्रिलपर्यंत १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २६ मुलांना तस्करीतून वाचवण्यात आले आहे. गेल्या वर्षापासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८७ मुलांची सुटका करण्यात आली असून त्यात उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक आहे.

मुलांचा हजार किमी प्रवास…

सुटका करण्यात आलेल्या मुलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे कुटुबाला मदत करण्यासाठी मुले हजारो किलोमीटर प्रवास करून मुंबईत काम करण्यासाठी आली होती.

बाल कामगार ‘या’ व्यवसायात…

लहान मुले मुख्यतः कापड निर्मिती, हॉटेल (रेस्टॉरंट), चामड्यापासून वस्तूंची निर्मिती, किराणा दुकान, बांगडी कारखाने, टी सेंटर, खाद्यपदार्थ विक्री, कॅटरिंग व्यवसायात काम करताना आढळली. मुलांकडून अशा प्रकारे कामे करून घेणाऱ्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जातो, असे पोलिसांनी सांगितले.