मुंबई : शाळेतून घरी परतणाऱ्या दोन विद्यार्थिनींना भरधाव वेगात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी चेंबूर येथे घडली. या अपघातात एका विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तनीक्षा खंदारे (९) आणि सिदीक्षा खंदारे (६) अशी या जखमी विद्यार्थिनींची नावे असून दोघेही सख्या बहिणी आहेत. शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास दोघेही चेंबूरमधील नारायण गुरू शाळेतून त्यांच्या गोवंडी परिसरातील घरी जात होत्या. यावेळी शाळेपासून काही अंतरावरच भरधाव वेगात आलेल्या एका रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यानंतर रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या अपघातात दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने त्यांना तत्काळ गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
सिदीक्षाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला शीव रुग्णालयात हलविण्यात आले. सिदीक्षाचे वडिल अजय खंदारे (४३) यांनी याप्रकरणी रविवारी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.