मुंबईमध्ये तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वरळी व वांद्रे येथे दोन ज्येष्ठ नागरिकांची तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा समांतर तपास करीत आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ ओटीटीवर प्रदर्शित होणार

वरळी नाका परिसरात राजेंद्रकुमार गुप्ता (६३) यांच्याजवळ एक व्यक्ती आली आणि त्याने त्यांना गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. गुप्ता यांनी त्यास नकार दिला. त्यावेळी त्या व्यक्तीने गुप्ता यांना ओळखपत्र दाखवून आपण पोलीस असल्याचे सांगितले. सध्या आरोपी चरस-गांजा घेऊन जातात. त्यामुळे आम्हाला तपासणी करावी लागले, असे आरोपीने गुप्ता यांना सांगितले. त्यानंतर दुसरी व्यक्ती तेथे आली आणि त्याने गुप्ता यांच्याकडील बॅगेची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपीने गुप्ता यांच्याकडील बॅगेतील, तसेच अंगावरील दागिने एका रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तो रुमाल गुप्ता यांच्याकडे दिला. गुप्ता यांनी पुढे पेट्रोल पंपावर गेल्यावर रुमाल तपासला असता त्यात दागिने नव्हते. त्यामुळे गुप्ता यांनी तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी आरोपीविरोधात फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाच्या मदतीने पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>तिथे एकएक तास हा १०० दिवसांसारखा असतो ; मी स्वत:ला… – संजय राऊतांनी सांगितला तुरुंगातील अनुभव!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे येथेही अशाच प्रकारे पोलीस असल्याची बतावणी करून ६६ वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. तक्रारदार मनोहर भोवड हे वांद्रे येथील चिंबई कोळीवाडा येथील रहिवासी आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून भोवड यांच्याकडील सोनसाखळी घेऊन पळ काढला. याप्रकरणी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाच्या मदतीने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.