गोरेगावच्या (पूर्व) पांडुरंग वाडी आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोडला लागून असलेल्या ब्रह्मचारी विश्वनाथ गुरूजी उद्यानात शौचालय असताना आणखी एक शौचालय बांधण्याचा घाट घातला जात असून उद्यानाची जागा व्यापण्याबरोबर त्याची शोभा घालविण्याच्या या प्रकाराला स्थानिकांकडून विरोध होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार वर्षांपूर्वी या उद्यानाचे पालिकेने सुशोभीकरण केले होते. परंतु गेल्याच आठवडय़ात उद्यानाच्या पश्चिम बाजूला खड्डा खणून पीसीसी पायलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. हे बांधकाम शौचालयासाठी असल्याचे पी दक्षिण विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले. हे शौचालच ‘पे अ‍ॅण्ड युज’साठी असून आधीच्या शौचालयापासून ६० फुटांवर आहे. या उद्यानात आठ आसनी शौचालय आहे. परंतु, एका उद्यानात दोन शौचालये कशाला, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत. हे शौचालय  व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी उभारण्यात येत असल्याचा आरोप येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागाचे सचिव सचिन चव्हाण यांनी केला.

सर्वसामान्य नागरिकांना जर शौचालयाची सुविधा द्यायचीच असेल तर उद्यानातील आधीचे शौचालय खुले करून द्यावे. त्याऐवजी नवे शौचालय बांधून उद्यानाची शोभा व जागा वाया घालविण्याचे कारण काय, असा सवाल करत हे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक प्रभाग अध्यक्ष सलीम पटेल यांनी केली आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two toilets at same park
First published on: 14-09-2016 at 01:02 IST