मुंबई : दर आठ- पंधरा दिवसांनी होणारे शिवसेना (शिंदे) पक्षातील प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबले असल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश थांबले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील पक्षप्रवेशांना ओहोटी लागल्याची चर्चा सुरू आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पालिकेच्या निवडणुकीत या दोन बंधुंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो, असा अंदाज आहे. सध्या मराठीच्या मुद्द्यावर का होईना, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे.
बेरजेच्या राजकारणाचा दोघांनाही फायदा होईल. किमान मुंबईत तर नक्कीच फायदा होईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिंदे यांच्याकडे गेलेले अनेक माजी नगरसेवक, आमदार आमच्या संपर्कात असून परत येऊ इच्छितात, असा दावाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत.
ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळे आधीच शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असताना आता शिंदे यांच्या पक्षातील आमदार वादात सापडले आहेत. राजकीय कोंडी होऊ लागल्यामुळे ही अस्वस्थता वाढू लागली असल्याची कुजबुज सुरू आहे.
१९ जूननंतर एकाही माजी नगरसेवकाचा पक्ष प्रवेश नाही…
दुसऱ्या बाजूला आतापर्यंत दर आठ-दहा दिवसांनी होणारे ठाकरेच्या गटातील माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश सध्या थांबलेले दिसत आहेत. ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्याकडे जाणारा ओघ आटला असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली त्याच्या दुसऱ्याच दिवशी माजी चांदिवलीतील माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अजित भंडारी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. आदल्या दिवशी बैठकीला आलेला नगरसेवक आपल्याकडे खेचून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हानच दिले होते. मात्र त्यानंतर मुंबईतील एकाही माजी नगरसेवकाचा पक्ष प्रवेश झाला नाही.
राज ठाकरे यांनाही शह?
हिंदी सक्तीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध सुरू केल्यानंतर या दोन बंधूच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्याचवेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तुरडे यांचा पक्ष प्रवेश करवून शिंदेनी राज ठाकरेंना शह दिल्याची चर्चा होती. ठाकरे बंधू एकत्र मेळाव्यानंतर शिंदे यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विविध प्रकारे राज यांना गोंजरण्याचाही प्रयत्न केला. एका बाजूला राज ठाकरे यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न चालू असताना दुसरीकडे शिंदे यांच्या दुहेरी रणनीतीमुळे मनसे कार्यकर्त्यांत अविश्वास आहे.