मुंबई : ‘पंतप्रधान नागरी सहाय्य आणि आपत्कालिन मदत निधी’मध्ये ‘ (पीएम केअर फंड) महाराष्ट्रातून बराच निधी गेला आहे. आता अतिवृष्टीबाधितांना त्यातून ५० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिवृष्टीबाधितांना मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. पण सध्याची अतिवृष्टीची परिस्थिती पाहता प्रस्तावाची वाट न पाहता केंद्र सरकारने ‘पीएम केअर फंडा’तून मदत करावी. मोदी राज्यात दौऱ्यावर येणार असून त्यांनी मदतीची घोषणा करावी, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘मी नुकताच धाराशिव आणि लातूर येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली. परिस्थिती अतिशय विदारक आहे. हाताशी आलेले पीक पूर्ण नष्ट झाले असून, शेतामध्ये चिखल झाला आहे. राज्य सरकार करीत असलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. जमिनीची मशागत करून ती पिके घेण्यायोग्य करण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. एक एकरासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी आणि कर्जमाफी जाहीर करावी’, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
आम्ही सरकारमध्ये असताना कर्जमाफी जाहीर केली होती, पंचांग काढून बसलो नव्हतो, अशी टिप्पणीही ठाकरे यांनी केली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदत केली. येथेही ‘डबल इंजिन’ सरकारला आणखी एक इंजिन लागले आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना मदतही भरीव करावी, असे ठाकरे यांनी सांगितले.
‘फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार नाही’
फडणवीस यांच्या स्थितीवर मला दया येत आहे. करोना काळात उत्तर प्रदेशमध्ये कित्येक ठिकाणी चिता जळत होत्या. पण, महाराष्ट्रात आम्ही जनतेची काळजी घेतली. ‘शिवभोजन थाळी’ही आम्ही गरजूंना दिली. भाजपच्या आमदार-खासदारांनी सगळे पैसे ‘पीएम केअर फंडा’साठी दिले होते. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री सहायता निधीवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. भाजपला प्रशासन चालवता येत नाही. आता करोनाचे उणे-दुणे काढण्याची वेळ नसून शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पीएम केअर फंडात बराच पैसा राज्यातून गेला असून मोदी हे कोणाची केअर करीत आहेत, असा सवाल ठाकरे यांनी केला.