मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीच्या बैठकीत नेतेपदी निवड, उद्धव ठाकरे यांनी बोलाविल्या बैठकीस ४० आमदारांची गैरहजेरी, राज्यपालांकडे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा आणि सरकार स्थापन करणे, ही शिंदे गटातील आमदारांची कृती किंवा वर्तन हाच शिवसेना सोडल्याचा पुरावा असून मूळ पक्ष कोणाचा, याबाबत आधी निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवारी झालेल्या सुनावणीत करण्यात आला.

हेही वाचा >>> पाच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची घोटाळेबाजाच्या घरी भेट? जितेंद्र आव्हाडांनी थेट फोटो केले शेअर, म्हणाले

तर साक्षीपुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी शिंदे गटाकडून सुनावणीत करण्यात आली. नार्वेकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ज्या बाबी जाहीरपणे झालेल्या आहेत आणि त्याबाबत कोणीही आक्षेप घेतलेला नाही, त्यासाठी साक्षीपुरावे तपासण्याची गरज नाही. शिवसेनेची घटना, पक्षाची राजकीय पक्ष आणि संसदीय पक्षरचना, निवडणूक आयोगाकडे झालेला पत्रव्यवहार आदी बाबींसाठी कागदोपत्री तपशील उपलब्ध आहे. त्याआधारे मूळ पक्ष कोणाचा, या मुद्दय़ाचा निर्णय व्हावा. त्यानंतर अपात्रतेबाबत आमदारांना आपला बचाव करण्याची संधी देताना व्हीप मिळाला होता का, त्याचे पालन का केले गेले नाही, बैठकीसाठी का हजर नव्हता किंवा अन्य मुद्दय़ांवर बाजू मांडण्याची मुभा देण्यास हरकत नाही, असे ठाकरे गटातर्फे स्पष्ट करण्यात आले. तर प्रत्येक पक्षादेश मिळाला की नाही, त्याच्या गैरहजेरीची कारणे काय, अपात्रतेच्या नोटिसांमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ांवर उत्तरादाखल साक्षीपुरावे सादर करण्यास परवानगी असावी, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे आणि अनिल सिंग यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या १२ निकालपत्रांचा हवाला देत साक्षीपुरावे तपासले गेले पाहिजेत, असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे शिंदे गटातर्फे नमूद करण्यात आले. यासंदर्भातील अर्जावरील युक्तिवाद अपूर्ण असून पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.