रविवारी संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, त्यांच्याआधी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “२००९ साली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून उद्धव ठाकरेंनी मला निवडणुकीत पाडलं”, असा दावाही रामदास कदम यांनी केला आहे. यासंदर्भात आता ठाकरे गटाचे आमदार आणि ज्यांनी रामदास कदम यांना निवडणुकीत पराभूत केलं, त्या भास्कर जाधवांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते रामदास कदम?

रामदास कदम यांनी खेडमधील सभेतून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? २००९मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो मी”, असं रामदास कदम कालच्या सभेत म्हणाले होते.

“रामदास कदमांना मी बामलाव्या म्हणत होतो, कारण..”

दरम्यान, रामदास कदम यांच्या टीकेचा भास्कर जाधवांनी समाचार घेतला आहे. “कोकणात फार शिवराळ भाषा सभेत चालत नाही. कुणावर फार टीका-टिप्पणी करून खालच्या भाषेत बोललेलं आवडत नाही. काल रामदास कदमांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून माणसं उठायला सुरुवात झाली. तेव्हा उठायला सुरुवात झालेली माणसं नंतर एकनाथ शिंदेंचं भाषण संपत आलं तरी उठून निघतच होती. रामदास कदमांना मी बामलाव्या म्हणत होतो. कोकणातला तात्या विंचू म्हणत होतो. कारण गेल्या ८ महिन्यांत रामदास कदम ज्या मुलाखती देत आहेत, त्याव्यतिरिक्त रामदास कदमांकडून काल एकही नवा मुद्दा मांडला गेला नाही”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

Video: “मी पालघरला प्रचारासाठी निघालो तेव्हा आई आजारी होती, डॉक्टरचा फोन आला…”, एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

“त्यांना नवी उपमा देण्याची गरज, ती म्हणजे…”

“रामदास कदमांचा चेहरा जर खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समोर आणला, तर ही सगळ्या महाराष्ट्राची घोर चेष्टा असेल. ठाकरे घराण्यानं त्यांना मंत्री केलं म्हणून ते मंत्री झाले. खरं सांगायचं तर रामदास कदमांचा मंत्री म्हणून सभागृहात काय प्रभाव होता, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे रामदास कदमांना नवीन उपमा देण्याची गरज आहे. ती म्हणजे आमच्या कोकणातला जोकर”, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

“ती तर भाजपानं दिलेली स्क्रिप्ट होती”

“रामदास कदम हे आमच्यासाठी खूप मोठे मॉडेल आहेत. रामदास कदम बोलले ती भाजपानं लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. मोदींचा मोठेपणा, अमित शाह यांचा मोठेपणा, ३७० कलम, राम मंदिर हे सगळंच”, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group bhaskar jadhav mocks ramdas kadam khed rally pmw
First published on: 20-03-2023 at 16:18 IST