मुंबई : हिंदीला आमचा विरोध नाही. पण हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल. मराठीच्या मुद्द्यावर मी आणि राज ठाकरे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच. यामुळे मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे स्पष्ट संकेत दिले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आम्हाला शिकवू नये तसेच हिंदुत्वाचे ढोंग व सोंग सोडावे, अशी चपकारही लगावली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पाऊस असतानाही उद्धव ठाकरे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात भाजपचा जोरदार समाचार घेतला. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल की नाही याबाबत शंका व्यक्त करीत भाजप आणि शिंदे गटाने मुंबईचा विचका केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबईत भाजपाच महापौर झाला पाहिजे, असे अमित शहा वारंवार सांगत आहेत. त्यासाठी भाजपने मुंबईत हिंदू- मुस्लीम अशी विभागणी सुरू केली आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. मुंबईत आजही रस्त्त्यांवर खड्डे कायम आहेत. नागरी सुविधांच्या नावे बोंब आहे. मग गेल्या अडीच तीन वर्षांत मुंबईत केले तरी काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली जात नाही?’

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मग कर्जमाफी का केली जात नाही? २०१७ मध्ये फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अजूनही पूर्ण झालेली नाही. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आणि त्याची पूर्तती केली होती. भाजपवाले नुसत्याच घोषणा करतात, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

अतिवृष्टीमुळे शेतकरी पार खचला आहे. या शेतकऱ्याला मदत करण्याची खरी गरज आहे. पण नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना मराठवाड्यात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.