लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वेळ आल्यास सर्व जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत अचानक ४० लाख मतदार कसे वाढले याची तपासणी करा, असे आदेशही त्यांनी गटप्रमुखांना दिले.
शिवसेना वर्धापनदिनात राज्याच्या जे मनात आहे तेच करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी त्यांनी जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवन येथे आयोजित केली. या बैठकीत मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, अशीही कल्पना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. स्थानिक पातळीवर युती-आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिनाभरात हा अहवाल सुपूर्द करा. या अहवालावरून कुठे आघाडी किंवा युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल, असेही उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले.
‘उद्धवराज युतीबाबत ठाम माहिती नाही’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्याप्रमाणे दोघे ठाकरे बंधू खरोखर एकत्र येतील की नाही, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नाही. राजकारणात योग्य वेळ यावी लागते, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.