मुंबई : पुराव्यांनिशी आरोप केल्यांनतर भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ समज देण्यात आली. पुरावे देऊनही भ्रष्टाचाऱ्यांना केवळ समज देऊन सोडून देणार असाल, तर उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवले, धनकड कुठे आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला. चीनमध्ये कळत – नकळत सरकारविरोधात कोणी भाष्य केल्यास दोन ते तीन दिवसात संबंधित व्यक्ती अदृश्य होते. माजी उपराष्ट्रपती कुठे ते दाखवा. राजीनामा देताना त्यांनी तब्येत बिघडल्याचे कारण सांगितले. मग आता ते कोणत्या रुग्णालयात आहेत, कोणते डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत की सत्ताधाऱ्यांनी त्यांचे ऑपरेशन केले, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. धनकड हे सरकारविरोधात काहीतरी कारस्थान करीत असतील किंवा करीत होते, हा संशय आल्याने त्यांना तडकाफडकी काढल्याचे दिल्लीत गेल्यावर समजले, असेही त्यांनी नमूद केले.

महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, या मागणीसाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ठाकरे गटातर्फे सोमवारी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. २०१४ साली ज्याप्रमाणे मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केली होती, त्याप्रमाणे आता महाराष्ट्रात ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करायला हवी. ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोहोचवणे शक्य होईल, त्या पद्धतीने पोहोचवा. महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर येऊ घातलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांना डोके नाही. ते खोके घेऊन बसले आहेत. सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला त्यांच्याकडे केवळ पाय आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जुलूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू – फुले – आंबेडकर, साधुसंतांचा महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो. मात्र, या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या बाबतीत पहिल्या रांगेत, तर विकास आणि नीतिमत्तेच्या बाबतीत शेवटच्या रांगेत नेऊन ठेवले आहे, अशा शब्दात सत्ताधारी पक्षावरील संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला कीव येते. प्रचंड बहुमत असूनही भ्रष्टाचाऱ्यांना काढण्याची त्यांच्यात हिंमत होत नाही. भ्रष्ट मंत्र्यांना काढून त्यांच्याजागी दुसरे मंत्री घेण्यासाठी माणसे नाहीत का, फडणवीस यांच्यावर कोणाचा दबाव आहे. हा भ्रष्टाचार त्यांना पटतो का, हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावे. जर पटत नसेल, तर त्यांनी दबाव असल्याचे स्पष्ट करावे. सत्ता येते, सत्ता जाते, मात्र, इतिहासात तुमची नोंद काय होते, ते महत्वाचे असते. मी मुख्यमंत्री असताना आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. पण आता भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही त्यांना केवळ समज दिली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टीकात्मक नाटक आणि जोरदार घोषणाबाजी

दादर येथील शिवाजी पार्कमध्ये सोमवारी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. ‘भ्रष्टाचारी मंत्र्यांचा निषेध असो’, ‘डान्सबार चालवणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो’, ‘रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, सत्तेतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर आधारित टीकात्मक नाटकदेखील सादर करण्यात आले. ‘माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो, मला लाज वाटते’, ‘माझ्या राज्याचा मंत्री नोटांच्या बॅगा घेऊन बसतो, मला लाज वाटते’, ‘माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादू टोणा करतो, मला लाज वाटते!’ ‘कायद्याचे रक्षक बनले भक्षक’, अशा आशयाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी विरोधी पक्षावर टीका केली.