मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रस्ते मार्गे सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच महामुंबईतील सर्व महापालिकांची एकच परिवहन सेवा सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील बस सेवेत वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे विरार, उल्हासनगर, पनवेलवरून मुंबई गाठण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध होईल.
राज्य सरकारने १० जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई महानगर प्रदेशाकरिता एकात्मिक बस वाहतूक आराखडा तायर करण्यासाठी कार्यगट स्थापन केला आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) महाव्यवस्थापकांची या कार्यगटाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) दळणवळण आणि वाहतूक प्रमुखांची कार्यगटाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर या कार्यगटाच्या सदस्यपदी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त आणि नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, वसई – विरार, मीरा – भाईंदर, भिवंडी – निजामपूर, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. या एकात्मिक वाहतूक प्रयत्नामुळे एमएमआरमध्ये प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. तसेच वाहतुकीच्या जाळ्यात सुधारणा होईल आणि सार्वजनिक वाहतुकीची एकूण कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाने शहरी भागांना ‘ग्रोथ-हब’ म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेद्वारे देशभरातील निवडक क्षेत्रांसाठी आर्थिक वृद्धीचे धोरण तयार केले आहे. त्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू आहे. सुरुवातीच्या टप्यात प्रायोगिक तत्त्वावर मुंबई महानगर प्रदेश, गुजरातमधील सुरत, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी या चार शहरांत ‘ग्रोथ-हब’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे.