केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन चर्चा केल्यानंतर राजकीय तर्कवितर्काना सुरूवात झालेली असताना, आज केंद्रीय कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज ठाकरे यांचे निवास्थान गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.

या भेटीप्रसंगी भाजपा नेत्या शायना एनसी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या भेटीचे फोटो रावसाहेब दानवे यांनी आणि मनसेने ट्वीटरवर शेअर केले आहेत. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं दानवेंनी सांगितलं आहे. तर, काही महत्वाचे रेल्वे प्रकल्प तसंच रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य आदी महत्वाच्या विषयांबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी काही महत्वाच्या सूचना केल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर वादळी सभा झाली. यावेळी त्यांनी मांडलेली हिंदुत्वाची आक्रमक भूमिका, महाविकास आघाडी आणि शरद पवारांवर साधलेला निशाणा आदी सर्व मुद्य्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांची राज ठाकरेंसोबत सुरू झालेली चर्चा नक्कीच काहीतरी संकेत देत असल्याचं दिसत आहे.