महाराष्ट्रातील ६० ते ७० उमेदवारांची निवड

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेत बिहार येथील आणि आयआयटी मुंबई येथील पदवीधारक शुभम कुमार अव्वल ठरला आहे. राज्यातील साधारण चार ते पाच उमेदवारांनी पहिल्या शंभरात स्थान मिळवले आहे, तर साधारण ६० ते ७० उमेदवारांची निवड झाली आहे.

गेल्या वर्षी तुलनेत या परीक्षेसाठी कमी जागा होत्या. दरवर्षी साधारण नऊशे ते हजार जागांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा देशपातळीवर ८३६ जागांसाठी घेण्यात आली. त्यापैकी ७६१ जागांवर उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. देशात बिहार येथील शुभम कुमार याने प्रथम स्थान मिळवले आहे. शुभम याने आयआयटी मुंबई येथून सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. देशात दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश येथील जागृती अवस्थी, तर तिसऱ्या क्रमांकावर अंकिता जैन आहे.

 महाराष्ट्रातील मृणाली जोशी हिला ३६ वे, तर विनायक नरवडे याला ३७ वे स्थान मिळाले आहे. विनायक महामुनी हा ९५ व्या स्थानावर आहे. राज्यातील साधारण चार ते पाच उमेदवारांची निवड पहिल्या शंभरात झाली आहे, तर साधारण एकूण निवड झालेल्या उमेदवारांमध्ये राज्यातील साधारण ६० ते ७० उमेदवार आहेत.

उपलब्ध जागांपैकी १८० भारतीय प्रशासकीय सेवा, ३६ भारतीय परदेश सेवा, २०० भारतीय पोलीस सेवेतील आहेत. याशिवाय ३०२ केंद्रीय सेवेतील अ गटाची, तर ११८ ब गटातील पदे आहेत. परीक्षेसाठी साधारण १० लाख ४० हजार ६० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील १० हजार ५६४ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यातील दोन हजार ५३ उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम ७६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली.

  लातूर येथील नीलेश श्रीकांत गायकवाड   गुणांकनानुसार ६२९ श्रेणीत  उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ते यूपीएसी परीक्षेत भारतीय पातळीवरून ७५२ रँकने उत्तीर्ण झाले होते.

संरक्षण सहायक नियंत्रक पदी त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे.    ते आयआयटी मुंबई येथून रासायनिक अभियंता म्हणून उत्तीर्ण झाले.  बेंगलोर येथे कंपनीमध्ये सहयोगी तज्ज्ञ म्हणून सेवेत असताना  ते यूपीएससीकडे वळले.

मृणाली जोशीचे यश

देशात ३६व्या आलेल्या मृणाली जोशी हिने दुसऱ्या प्रयत्नात वयाच्या २४व्या वर्षी यश मिळवले आहे. मृणालीचे बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालयातून झाले, तर फर्गसन महाविद्यालयातून तिने २०१८मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली. ‘वाचन, लेखन, चित्रकला, स्वयंअध्ययनामुळे यूपीएससीमध्ये यश मिळवता आले. आई-वडिलांनी  माझ्या आवडीप्रमाणे शिकण्याची मुभा दिल्याने आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करण्याची संधी मिळाली आहे,’ असे मृणालीने सांगितले.

मला गेली काही वर्षे डोळ्यांचा त्रास  जाणवत होता. हळूहळू तो त्रास वाढला आणि मला अंधत्व येऊ लागले. मी विद्यान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु यूपीएससी करायचे म्हणून मी कला शाखेतून पदवी घेतली. एम.ए. करत असताना मला ८० टक्के अंधत्व आल, त्यामुळे वाचन पूर्णत: बंद झाले. पण माझ्या सोबत असलेले मित्र, फर्गसनचे विद्यार्थी, नातेवाईक यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. ते मला वाचूनही दाखवत असे. अभ्यास वाढवण्यासाठी स्क्रीन रीडिंगचे तंत्रज्ञान मला शिकून घ्यावे लागले. फर्गसनमधील  ‘साठी’ या विद्यार्थ्यांच्या गटाने मला खूप मदत केली.

-पूजा कदम, रँक ५७७

यवतमाळ जिल्ह्यात मी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. अमरावती मधून माझे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण घेत असतानाच यूपीएससी परीक्षा  देण्याचे मनात आले. परंतु आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मी दोन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. नोकरी सोडल्यानंतर काही काळ पुणे आणि मग दिल्लीत जाऊन अभ्यास केला. 

-दर्शन दुगड, १३८ वा रँक

मी नगर जिल्ह्याचा असून माझे प्राथमिक शिक्षणही गावीच झाले. पुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. त्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून तीन वर्षे मास्टर्स पूर्ण केले. एक वर्ष तिथे नोकरीही केली. त्यादरम्यान शासकीय सेवेत नोकरी करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि तिथेच अभ्यासाला लागलो. मग नोकरी सोडून गावी आलो, स्वत: अभ्यास सुरू केला, मित्रांचे मार्गदर्शन घेतले. घरच्यांनीही मला भरपूर पाठिंबा दिला म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य झाले.

-विनायक नरवडे, ३७ वा रँक

बारावी सुरू असतानाच यूपीएससी परीक्षा देण्याचे मनात आले. त्या दृष्टीने हळूहळू अभ्यास सुरू केला. मी फर्गसन महाविद्यालयातून मानसशास्त्राची पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना  खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात झाली. यामध्ये माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

-नितीशा जगताप, १९९ वा रँक