सिद्धेश्वर डुकरे, लोकसत्ता
मुंबई : ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ (नागरी) या कार्यालयाच्या संचालकपदावरून सहा महिन्यांच्या कालावधीत शासनाच्या नगरविकास विभागाने तडकाफडकी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या कार्यालयाची तात्पुरती जबाबदारी सध्या नगरविकास विभागातील उपसचिव हुद्दय़ावरील अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. नगरविकास विभागाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या अभियानाकडे दुर्लक्ष होत असून अभियानाच्या मूळ हेतूलाच धक्का बसल्याचे मानले जाते.
या अभियानाला २०१४-१५ मध्ये सुरुवात झाली. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ राज्यात सुरू केले.
या अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै २०२२ रोजी अनिल मुळे यांची संचालकपदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी समीर उन्हाळे यांची संचालक म्हणून नगरविकास विभागाने नेमणूक केली. यानंतर जेमतेम चार-साडेचार महिन्याच्या कालावधी नंतर १२ डिसेंबर २०२२ मध्ये उन्हाळे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या ठिकाणी औरंगाबाद येथील श्रीमती अॅलिस सुफी पोरे ( अॅलिस पस्ताकिया) यांना संचालकपदी नेमल्याचा शासनादेश काढला. श्रीमती पोरे यांनी कौटुंबिक कारणावरून पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे सध्या संचालकपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास विभागातील उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्याकडे आहे. यामुळे मागील सहा महिन्यांत या अभियानाचे तीन संचालक बदलले असून सध्या प्रभारी म्हणून जेवळीकर काम पाहत आहेत.
मुंबई महानगरपालिका वगळून इतर महानगरपालिका, नगरपालिका,एक लाख लोकसंख्येची ग्रामीण शहरे, नगर परिषदा, नगरपंचायती यासंबंधीचे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन करणे. त्यासाठी शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. त्याची अंमलबजावणी करणे.ही प्रमुख कामे या अभियानामार्फत केली जातात. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य हे दोन्ही आर्थिक हातभार लावत आहेत.
या अभियानाद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावरही भर द्यावा लागेल, अशी अपेक्षा ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ राज्यात सुरू करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली होती.