ज्येष्ठ बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री शम्मी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. चित्रपटसृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान असून २०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. विनोदी भूमिकासांठी त्या ओळखल्या जायच्या. ‘कुली नं १’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्यावरील ‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’ आणि ‘फिल्मी चक्कर’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे त्या लक्षात राहिल्या होत्या. शम्मी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. फॅशन डिझायनर संदीप खोसलानेही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.