मुंबई : दक्षिण मुंबईतील सुशोभिकरण कामांची लवकरच चौकशी होणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाने या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या ए विभागाला पत्र पाठवून विविध विकासकामांशी संबंधित गेल्या दोन वर्षातील कागदपत्रे मागवली आहेत.
चर्चगेट, कुलाबा या परिसराचा समावेश असलेल्या ए विभागात गेल्या दोन तीन वर्षात जी विकासकामे व सुशोभिकरण झाले त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे. याप्रकरणी दौंडकर यांनी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र लिहून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. पालिका आयुक्त भूषण गगराणी, शहर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी दौंडकर यांनी पत्र लिहिले आहे. कुलाबा परिसरात केलेल्या सुशोभिकरण कामांमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे. करोडोच्या निधीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे. तसेच ज्या ठिकाणी कामेच झाली नाहीत तिथे कामे झाल्याचे दाखवून त्याबाबतचे पैसे ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोपही दौंडकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.
ए विभागांतर्गत सुशोभीकरण व गलिच्छ वस्ती निधीतून व इतर केलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याबाबतची तक्रार आल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाने पालिकेच्या ए विभागाकडे गेल्या दोन वर्षातील विकासकामांचा वर्षनिहाय गोषवारा मागितला आहे. तसेच विकासकामांच्या कार्यादेशांच्या मूळ नस्त्या संपूर्ण कागदपत्रांसह सादर करण्याबाबत आदेश दक्षता विभागाने दिले आहेत. दक्षता विभागाने यापूर्वीच ऑगस्ट महिन्यातच ही कागदपत्रे सादर करण्यास ए विभागाला सांगितले होते. मात्र गणेशोत्सवानंतर कागदपत्रे सादर केली जातील असे ए विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळवले होते. मात्र अद्याप कागदपत्रे सादर न केल्यामुळे दक्षता विभागाने आता दोनच दिवसांपूर्वी ए विभागाला पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवून सर्व कागदपत्रे तत्काळ सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत.