मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या ६ नोव्हेंबरला मतदारयादी जाहीर होणार आहे. प्रारुप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत त्यावर सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. मतचोरीच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदा मतदारयादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम १४ ऑक्टोबरला जाहीर केला आहे. यानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीवरून तयार केलेली मतदारयादी प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागवल्या जाणार आहेत. १४ नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर १० डिसेंबर रोजी मतदान केंद्र निहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारयाद्या प्रभागनिहाय विभागण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षही सक्रिय झाले असून गेल्याच आठवड्यात शनिवारी महाविकास आघाडीने मतदारयाद्यांमधील घोळाबाबत मोर्चा काढला होता. मतदारयाद्यांमधील दुबार नावांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये मतदारयाद्यांमध्ये दुबार नावे असल्यामुळे बोगस मतदार वाढल्याचीही टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे यावेळी मतदारयाद्यांवर जास्तीत जास्त तक्रारी येण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी पात्र ठरवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदारयादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदारयादी वापरली जाते. मात्र १ जुलैपर्यंतची मतदारयादी विधानसभा मतदारसंघनिहाय आहे. ती प्रभागनिहाय करण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच ते सहा प्रभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यादी ही पाच प्रभागात विभागली जाणार आहे. त्याकरीता संगणकीय मदत घेतली जाणार आहेच, पण प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करूनही यादी तयार केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारयाद्यांबाबतचे वेळापत्रक

मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक – १ जुलै २०२५

विधानसभा निवडणुकीच्या वेळच्या मतदारयाद्या डाऊनलोड करणे – १४ ऑक्टोबर २०२५

मुंबई महापालिकेच्या प्रभागानुसार तयार केलेली मतदारयादी प्रसिद्ध करणे – ६ नोव्हेंबर २०२५

प्रारुप मतदारयादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत – १४ नोव्हेंबर २०२५

हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे – २८ नोव्हेंबर २०२५

मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे – ४ डिसेंबर २०२५

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे – १० डिसेंबर २०२५