मुंबईच्या मालाड परिसरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाड पूर्वेला असलेल्या एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर या चाळीची भिंत कोसळल्याचं समजतंय. या घटनेत चार जण जखमी असून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आज (दि.1) सकाळी नऊच्या सुमारास मालाडच्या एमएचबी कॉलनी परिसरातील एका चाळीची भिंत कोसळली. घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर ही भिंत कोसळली, यामध्ये चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मंजू आनंद नावाच्या महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, जखमींपैकी ममता पवार ही 22 वर्षीय महिला सुमारे 80 टक्के भाजली असून तिची प्रकृची गंभीर असल्याचे समजते. त्याचप्रमाणे अश्विनी जाधव ही तरुणीही या दुर्घटनेत 15 टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. शीतल काटे (44 वर्षे) आणि सिद्देश गोटे (19) अशी उर्वरीत जखमींची नावे आहेत.