मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा नुकताच जाहीर झाला असून त्यावर ४ सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. मात्र हरकती व सूचना नोंदवण्यासाठीचा काळ हा ऐन गणेशोत्सवात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. उत्सवात जनसंपर्क वाढवायचा की प्रभागाच्या सीमाबाबतचा अभ्यास करायचा असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. तसेच अद्याप राजकीय पक्षांनी उमेदवारांना हिरवा कंदिल दिलेला नसल्यामुळे हरकती व सूचना तरी कशा नोंदवायच्या असाही प्रश्न या उमेदवारांना पडला आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री जाहीर केला. या प्रारुप आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली तेव्हापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. गेली तीन वर्षे या निवडणूकीच्या घोषणेकडे लक्ष लावून बसलेले इच्छुक उमेदवार प्रभाग पुनर्रचनेच्या सूचनेमुळे गोंधळात सापडले आहेत. प्रभाग पुनर्रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यामुळे एक प्रकारे निवडणूकीचे बिगुल वाजल्यासारखे झाले आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात हरकती व सूचनांसाठी अवघ्या दहा पंधरा दिवसांची मुदत दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत. मात्र दिलेल्या सीमारेषा प्रत्यक्षात जागेवर जाऊन तपासून बघणे उमेदवारांना भाग आहे. याबाबत काही माजी नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभागाच्या सीमारेषा आम्हीही पडताळून पाहतो. त्याकरीता विभाग कार्यालयाची मदत घेतो, पोलिसांची मदत घेतो. कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रत्येक कानाकोपरा घटनास्थळी जाऊन पाहतो. कोणत्या इमारती आपल्या प्रभागात आल्या कोणत्या दुसऱ्या प्रभागात गेल्या हे पडताळून पाहतो. त्यात बदल असतील तर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी तेथील रहिवासी संघटनांचे पत्र जोडतो. अन्य प्रभागातील उमेदवारांशी चर्चा करतो या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागतो. मात्र उत्सव असल्यामुळे हे सगळे करणे मुश्कील होणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवकांनी दिली आहे.

राजकीय पक्षांकडूनही हिरवा कंदिल नाही

दरम्यान, राजकीय पक्षांनी अद्याप ज्या उमेदवारांना हिरवा कंदिल दिलेला नाही त्यांच्यासमोर प्रभाग पडताळणी करायची की नाही त्याबाबत हरकती व सूचना नोंदवायच्या की नाहीत, की स्वतःच्या जबाबदारीवर हे सगळे करायचे असेही प्रश्न पडले आहेत. त्यामुळे उमेदवार सध्या संभ्रमात सापडले आहेत. तसेच राजकीय पक्षांकडून बैठका आयोजित करून उमेदवारांना मार्गदर्शन केले जाते. अशा बैठका आता उत्सवाच्या काळात होण्याची शक्यता कमी आहे.

सरासरी ५४ हजार लोकसंख्या प्रभागांच्या लोकसंख्येचा विचार करता यावेळी किमान ४५ हजार ते कमाल ६४ हजार इतकी लोकसंख्या प्रभागांमध्ये आहे. सर्वात कमी लोकसंख्या गोरेगाव पहाडी येथील प्रभाग क्रमांक ५१ मध्ये ४५,४६३ इतकी आहे. तर सर्वात जास्त लोकसंख्या भेंडीबाजार, सॅण्डहर्स्ट रोड येथील प्रभाग क्रमांक २२४ मध्ये ६४,२४५ इतकी आहे. सरासरी लोकसंख्या ५४,८५४ इतकी आहे.